राष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचरसंडे मॅटिनी

आम्ही निपुत्रिकच बरे…

लेखक – राजेंद्र भट

नाती अशी आणि तशीही… बऱ्याचदा आपण समजतो त्यापेक्षा जीवन हे फार वेगळे असते. त्यात प्रत्येक वेळी भावनांना किंमत असतेच असं नाही. चांगल्या वागणुकीचे चांगलेच फळ मिळेल असंही नाही. मग जगावं तरी कसं? पेराल ते उगवेल असं म्हणतात, पण अतिवृष्टीने पिकही नासतं. लोक सांगतात ते पचनी पडत नाही व नंतर तसे घडले तर फारच अपचन होते. इतके की त्यामुळे आयुष्य बिघडते, संपतेच. मार्गदर्शक काही कथा, अनुभव असतात. त्यांतून काही घेण्यासारखे, शिकण्यासारखे असते. फक्त ते घेता मात्र आले पाहिजे. अशाच एका सत्यकथेवर आधारित कथानक आज सामायिक करीत आहे. वाचा व विचार करा…

आई : किमान चार पोळ्या तरी ठेवत जा गं आम्हाला दोघांना. एकेक पोळी खाऊन कसं दिवसभर राहायचं सांग बरं?
पूर्वा : आई, तुमचं आता वय झालं आहे. उगाच खा खा करू नका. तुमचीच तब्येत बिघडेल अशानं…
बाबा : अगं उपाशी मरण्यापेक्षा आजारी पडलेलं परवडेल. पोटाला पीळ बसतो गं. असं उपाशी नको ठेवूस दिवस दिवस आम्हाला.
पूर्वा : बाबा तुम्ही आजारी पडलात तर तुमची उस्तवार कोण करणार आहे? माझं प्रमोशन ड्यू आहे. सुट्या घेणं मला अजिबात परवडणार नाही आणि मी कामावर जायला निघताना असं रोज रोज रडगाणं गाऊन नाट लावू नका माझ्या दिवसाला… येते मी..
पूर्वा आणि तिचे म्हातारे आई-वडील, तिघांमध्ये रंगणारा हा रोजचा सुखसंवाद… सर्वसाधारणपणे आपण काही गृहीतं बाळगलेली असतात… त्यापैकीच एक म्हणजे, ‘लेक कधीच आई-बापाला अंतर देत नाही…’ पण प्रत्येक गोष्टीसाठी अपवाद असतोच… असंच एक अपवादात्मक उदाहरण म्हणजे पूर्वा.
आई : अहो ऐकलंत का? पूर्वाच्या शाळेची ट्रीप जाते आहे पुढल्या महिन्यात महाबळेश्वरला… तिच्या सगळ्या मैत्रिणी जात आहेत, त्यामुळे आपण नाही पाठवू शकलो तर पोरीचा विरस होईल हो.
बाबा : ह्या महिन्यात विजेचं बिल जास्त आलं आहे, शिवाय आईसाठी गावी पैसे पाठवावे लागले. त्यामुळे सगळं बजेट कोलमडलं आहे आपलं.
आई : मी काय म्हणते… आपल्या घरी प्रसन्नला सांभाळायला ठेवतात. त्याच्या आईला सांगून बघू का? की पुढल्या महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये द्या असं…
बाबा : बघ तुला प्रशस्त वाटत असेल तर विचारून बघ प्रसन्नच्या आईला.
पूर्वा, एकुलती एक लेक, तीदेखील लग्नानंतर उशिरा झालेली. दिसायला नक्षत्रासारखी सुंदर, शिवाय अभ्यासात हुशार… त्यामुळे आई-बाबांची अत्यंत लाडकी… आपल्या लेकीला जमेल तेवढ्या सुख-सुविधा देण्यासाठी दोघं धडपडत.
पूर्वाचे बाबा मिल मजूर, आई मुलं सांभाळून संसाराला हातभार लावत होती. पूर्वाने खूप शिकावं एवढंच दोघांचं स्वप्न होतं आणि पूर्वादेखील मन लावून अभ्यास करीत करीत एमबीएपर्यंत शिकली आणि आई-बाबांच्या कष्टाचं चीज झालं.
मिलनसोबत पूर्वाने परस्पर सूत जुळवलं होतं. आई-बाप विरोध करणार नाहीत, ह्याची तिला खात्री होतीच. परधर्मीय म्हणून बाबा नकार देत होते मिलनला सुरुवातीस… पण एकुलत्या एका मुलीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली.
लग्न झालं… पुढील दोन वर्षांत पूर्वाने तनिष्काला जन्म दिला. मिलनला आई-वडील नव्हते, त्यामुळे तनिष्काला सांभाळायला म्हणून पूर्वाचे आई-बाबा तिच्याकडे येऊन राहिले.
रिटायर झाल्यावर तनिष्कामुळे बाबांचा वेळ चांगला जात होता. एव्हाना पूर्वाची आजी, म्हणजे बाबांची आई वारली. आता गावी नुसतं घर ठेवून काय उपयोग? म्हणून बाबांनी ते विकलं. मिळालेल्या पैशाची त्यांनी एफडी बनवून ठेवली, म्हातारपणीची तरतूद म्हणून.
“आई मी एक सुचवू का?” मिलनने एक दिवस सासूजवळ मनातला विषय काढला. तुम्ही दोघं सेपरेट राहता. त्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे कायमचं राहायला का येत नाही? तसंदेखील मला आई-वडील नाहीत. त्यामुळे तुम्ही इथे येऊन राहिलात तर पूर्वाला तुमची काळजी लागून राहणार नाही. तनिष्कालादेखील आजी-आजोबा मिळतील. तिच्या संगतीत तुमचा वेळही चांगला जाईल.”
जावयाच्या प्रस्तावाने सासू-सासरे दोघंही सुखावले. हक्काचं राहतं घर विकून लेकीच्या दारात आले. शेजारच्या लोकांनी किती समजावलं त्यांना… ‘तुम्ही हाती पायी धड आहात तोवर राहा वेगळेच… आतापासून लेकीच्या घरी जायची चूक करू नका.’ पण ‘लोकांना आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून असलं काही बोलत असतात,’ असा सोईस्कर गैरसमज करून घेत दोघं पूर्वाच्या घरी येऊन राहिले.
तनिष्का आता शाळेत जाऊ लागली. आता आई-बाबाचा उपयोग कमी आणि अडचण जास्त वाटू लागली.
एकदा मिलनच्या ऑफिसचे मित्र-मैत्रीण जेवायला घरी आलेले. आई-बाबा हॉलमध्ये बसले होते. त्यांच्यासमोर गप्पा मारणं मिलनला बरं वाटेना. त्याने साधी ओळखदेखील करून नाही दिली सासू-सासऱ्यांची.
पूर्वाला सांगून त्याने दोघांना बेडरूममध्ये नेऊन बसवलं आणि बाहेरून दरवाजा लॉक केला. सगळी पाहुणे मंडळी गेल्यावर म्हातारा-म्हातारीला जेवण मिळालं आणि ‘इथून पुढे घरात पाहुणे आले की बाहेर थांबायचं नाही… आम्हाला खूप ऑकवर्ड वाटतं’ ही तंबी दिली पूर्वाने. आपल्या लेकीला आपली लाज वाटते, ह्यासारखं दुःख दुसरं कुठलं असू शकेल आई-बापासाठी?
पूर्वाने बापाच्या नकळत एफडी मोडल्या आणि ते पैसे नवीन घर घ्यायला वापरले. आई-बाबानी त्यांचं राहतं घर विकलं ते पैसे तर ती आधीच खाऊन बसली होती…
हाय फाय कॉलनीमध्ये त्यांचं नवं घर होतं, जिथे वर्षानुवर्षे आजूबाजूला राहून लोक एकमेकांना ओळख दाखवत नाही, तिथे शेजारच्या घरी जाऊन विरजण मागण्याचा अगोचरपणा पूर्वाच्या आईने केला. त्या दिवसापासून पूर्वा आणि मिलन कामावर जाताना घराला बाहेरून कुलूप घालू लागले.
एक चावी तनिष्काकडे होतीच. तीसुद्धा शाळेला, क्लासला जाता-येताना आजी-आजोबांना घरात कोंडून जात असे. तिच्या आई-बापाचीच शिकवण होती तशी, त्यामुळे त्यात काहीच गैर वाटत नसे तिला.
अलीकडे बाबांना दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसेनासं झालं होतं. डॉक्टर म्हणाले होते, लवकरात लवकर ऑपरेशन करायला हवं असं… “आपण ऑपरेशन करायचं का त्यांचं?” आई लेकीला विनवत होती.
“अगं आई, ऑपरेशनला काय कमी खर्च येतो का? जागेचे हप्ते भरतानाच आम्हाला नाकी नऊ येतात आणि तसंदेखील बाबांना डायबिटिस आहे, बीपी आहे… ऑपरेशन करून काहीच उपयोग व्हायचा नाही. पेपर, पुस्तकवाचन बंद करा, टीव्ही बघू नका… हल्ली बिलं किती येतात लाईटची…” पूर्वा मुक्ताफळं उधळत होती.
“अगं पण आम्ही कुठे तुझ्याकडे पैसे मागत आहोत? मी रिटायर झालो, घर विकलं ते पैसे आहेत ना बँकेत? त्यांनी करू खर्च…” बाबा बोलले. पण ह्यावर काहीच न बोलता पूर्वाने काढता पाय घेतला.
नंतरदेखील पैशाचा विषय निघाला की, पूर्वा आकांडतांडव करू लागली… आपल्या लेकीने आपल्याला फसवलं हे दोघं समजून चुकले… पण पश्चाताप करण्यापलीकडे हातात काहीच उरलं नव्हतं. अंधपणा आल्यामुळे दिवसभर बाबा एका जागी बसून राहत.
एकदा तनिष्का आणि पूर्वा शाळेतला प्रोजेक्ट करीत होते. बाथरूमला जायला म्हणून बाबा उठले. नकळत त्यांचा पाय लागून प्रोजेक्ट खराब झालं. चार तासांची मेहनत फुकट गेली. तनिष्काचा हिरमोड झाला तो वेगळाच.
त्या रागाने पूर्वाने बाबाला ढकलून दिलं मागे. “दिसत नाही का तुला आंधळ्या? एवढी मेहनत घेऊन आम्ही हे बनवलं होतं. तुझा पाय लागून सगळ्याची वाट लागली. उद्या तनिष्काला शाळेत तुझ्यामुळे बोलणी खावी लागतील. मरतसुद्धा नाहीत लवकर दोघं.”
पूर्वाच्या धक्याने बाबा बेडवर पडले. सुदैवाने कुठलीही शारीरिक दुखापत झाली नाही. पण मनावर झालेला आघात त्यापेक्षाही खूप खोल जखम करून गेला.
आता असं वारंवार अपमान होऊ लागले दोघांचे. त्यांना त्रास द्यायला ती नवनवीन गोष्टी करू लागली. घरातलं केबल कनेक्शन काढून टाकलं. दुपारच्या जेवणासाठी दोघांना मोजून एकेक पोळी आणि थर्मासमध्ये दोन कप चहा ठेवू लागली.
एक दिवस घरकाम करायला निर्मला आली. तिने पाहिलं म्हातारा-म्हातारी रडत बसले आहेत. मायेने विचारपूस केल्यावर दोघं घडाघडा बोलू लागले.
“तुम्ही पोलिसांत कम्प्लेंट का नाही करत?” निर्मलाने सुचवलं.
“अगं, आपलेच दात आणि आपलेच ओठ… लेकीविरुद्ध कम्प्लेंट करून काय उपयोग? तसंदेखील आमचे किती दिवस उरलेत आता?…” लेक कितीही निष्ठूर निघाली तरी आई बापाला तिच्याविरुद्ध पाऊल उचलायला अवघड वाटत होतं.
आपण काहीच करू शकत नाही, म्हणून निर्मलाला वाईट वाटत होतं… “मी तुम्हाला खायला बनवून देऊ का?” किचनमध्ये जात निर्मला म्हणाली. पण किचनमध्ये खाण्या-पिण्याच्या सगळ्या गोष्टी कपाटात होत्या आणि सगळ्या खणांना कुलूप होतं.
“थांबा, मी माझ्या घरून काही तरी आणते खायला…” निर्मला घरी जाऊन परत आली ते येताना दोघांना घरातलं उरलेलं जेवण घेऊनच. बरेच दिवसांनी दोघं पोटभर जेवली.
त्यानंतर निर्मला रोजच येताना काही ना काही घेऊन येऊ लागली. रोज स्वतःच्या घरून आणणं शक्य नव्हतं. म्हणून ती जिथे कामाला जायची त्या लोकांकडून मागून घ्यायची खाणं पिणं. असं लोकाकडचं खाताना कसं तरीच व्हायचं दोघांना. पण भुकेपुढे दोघं लाचार झाली होती.
आई : आपण वृद्धाश्रमात जायचं का राहायला?
बाबा : अगं वृद्धाश्रमात जायचं म्हटलं तरी फुकट नाही ठेवत तिथे कोणी. रग्गड डिपॉझिट घेतील. शिवाय मासिक भाडं वेगळंच आणि उद्या आजारी पडलो तर घरी पाठवतात म्हणे परत.
आई : मग मरण येईपर्यंत असंच कुढत राहायचं का?
बाबा : दुसरा काही पर्याय आहे का?
आई : एक पर्याय आहे…
बाबा : काय?
आईने खूप दिवसांपासून मनात साचलेला विचार बोलून दाखवला.
आई : जमेल तुम्हाला? तुमची तयारी आहे का मनाची?
बाबा : हो जमेल…
नेहमीप्रमाणे पूर्वा, मिलन, तनिष्का आपापल्या कामाला बाहेर पडले… आणि…. आणि… थोड्याच वेळात कंपाउंडमध्ये काही तरी धपकन पडल्याचा आवाज आला. वॉचमन धावत येऊन बघेपर्यंत परत काही तरी धपकन खाली पडलं.
लोक जमा झाले… पूर्वाच्या आई-बाबांनी गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली… पोलीस केस झाली.
पूर्वा आणि मिलनने घरी येऊन खोटं खोटं रडण्याचं नाटक केलं… पण निर्मलाने धीर करून दोघांच्या पापाचे पाढे वाचून दाखवले पोलिसांना.
निर्मलाच्या जबानीप्रमाणे पूर्वाच्या घराला बाहेरून लॉक होतं. घरात फक्त दोन पोळ्या आणि थोडी भाजी आणि दोन कप चहा एवढंच होतं. बाकी सर्व खायच्या वस्तू कुलपात होत्या. दोघांना अटक करायला एवढे पुरावे आणि साक्ष पुरेशी होती..
आई-बापाचा खाल्लेला पैसा आता कोर्ट कचेरी करण्यात दवडते आहे पूर्वा…
(अतीरंजित वाटत असली तरी ही एक सत्यकथा आहे… फक्त पात्र आणि काही प्रसंग काल्पनिक आहेत ) — राजेंद्र भट

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये