“हा निकाल अंतिम नाही”; उद्धव ठाकरेंनी दिले पुढच्या आरपारच्या लढाईचे संकेत..
मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. या निकालावर उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निकाल अंतिम नाही, अशा शब्दांत त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे संकेत दिले. तसेच नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याचंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीनं लवाद म्हणून नार्वेकरांना बसवलं होतं त्यावरुन त्यांच्या वागणुकीतून हे स्पष्टपणे दिसत होतं की, यांची मिलीभगत आहे. आजच्या निकालामुळं एक गोष्ट प्रश्नांकित झालेली आहे की पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावं आणि त्याचा राजमार्ग कसा असेल हे त्यांनी सांगितलं.
आजपर्यंत आपण असं मानत आलो की, भारताच्या घटनेनुसार सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे सुप्रीम असतात. पण नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला त्यातून त्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवले आहेत. आमच्या मागं महाशक्ती आहे आम्ही सुप्रीम कोर्टाला सुद्धा जुमानत नाही हे त्यांच्या निकालातून दिसून आलेलं आहे.