मुंबईराष्ट्रसंचार कनेक्टशेत -शिवार

पाऊस आला मोठा

निसर्गचक्र व्यवस्थित चालण्यासाठी पुरेसा आणि उपयुक्त पाऊस पडावा आणि त्यासाठी वरुणराजाची आराधना करण्याचे संस्कार बालवयापासूनच आपल्याला शिकवण्यात आले आहेत. किंबहुना बडबडगीतांमध्ये देखील पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा असे सांगत पाऊस येण्याकरिता एक सकारात्मकता निर्माण करण्याचे संस्कार पेरले गेले.

गेल्या आठ महिन्यांमध्ये दुर्गम ग्रामीण भागासह अनेक परिसराला दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाण्याची चिंता सतावणाऱ्या शहरी भागालादेखील पावसाची चिंता होती. अखेर पाऊस आला आणि धो धो बरसला. अशा या पावसाबद्दलचे सकारात्मक चिंतन आता नकारात्मक शेतीमध्ये बदलत आहे. आज दिवसभर राज्यातील सर्वदूर परिसरामध्ये बघितलेले पावसाचे रौद्र रूप पाहता पाऊस खरोखरच खूप मोठा झाला असे केविलवाणे सूर उमटू लागले आहेत. कुठे अतिवृष्टी, तर कुठे रस्ते बंद. कुठे दुबार पेरण्याचे संकट, तर कोठे शेतीच वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. वातावरणाचे हे निसर्गचक्र का बिघडत आहे आणि याला काय केले पाहिजे, याचे उत्तर आज कोणाकडेही नाही.

एकतर पाऊस व्यवस्थित व्हावा म्हणून झाडे लावण्यापासून जमिनीची धूप थांबवण्यापासून ते अगदी वरुण यज्ञयाग करेपर्यंत सर्व प्रयत्न लोकांनी केले. पाऊस कोसळला, परंतु या जलधारा सहन करण्याची आपली क्षमता नाही. मानवी यंत्रणेच्या पलीकडे जाऊन कोसळणारा हा पाऊस आता आपल्याला झेपत नाही हेदेखील याच निसर्गाने दाखवून दिले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सगळीकडे पाऊस सुरू आहे, परंतु अहमदनगर जिल्ह्याला पावसाचे दर्शन नव्हते.

आज झालेल्या या पावसामुळे पाथर्डी, शेवगाव या परिसरासह अनेक मोठ्या भागांना पावसाने धुवून काढल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पालघरच्या आदिवासी भागात तर पावसाने आपले रौद्र रूप धारण केले आहे. इर्शाळवाडीची घटना ताजी असताना अनेकदा खोऱ्यांमध्ये आणि घाटातील रस्त्यांमध्ये दरड कोसळण्याच्या घटनांची भीती मनामध्ये घर करून आहे. सुदैवाने आपत्ती निवारणाची यंत्रणा पूर्णपणे समर्थ आणि सक्षम असल्यामुळे तेवढा एक दिलासा आहे.

मालवणच्या जेट्टीला धक्का बसला, तर मुंबई-अहमदाबाद हायवेवर पाणी साचून जवळपास तो मार्ग बंद झाला आहे. कोकणामध्ये आणि मुंबई पट्ट्यामध्ये हे रोज रोज दिसत असताना अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावे इतका पाऊस कोसळत आहे. शहरी भागामध्ये विशेषतः मुंबईसारख्या भागात अजूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी जिरून जाण्यामध्ये खूप मोठा वेळ लागत आहे. येथील सर्व पाणी समुद्रालाच मिळते, परंतु अंतर्गत पावसाचे जे रस्ते काढून द्यायला पाहिजे होते, जे चेंबरची डागडुजी करायला पाहिजे, ते मनाच्या जलवाहिन्या सक्षम करायला हव्या त्यादेखील झालेल्या नाहीत हे दिसून आले. त्या पावसामुळे केवळ ग्रामीणचे नुकसान झाले नाही तर शहरांमधील हे नुकसान होत असताना रस्त्यांच्या दुरवस्थेचे देखील मोठे संकट उभे ठाकले आहे आणि ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत.

त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यांची डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याची आवश्यकता भासते आहे. पावसाचे हे रौद्र रूप सगळ्या राज्याला चिंता करायला लावणारे आहे. या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मालमत्तेची हानीदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु इर्शाळवाडीसारखी घटना पुन्हा घडू नये आणि नैसर्गिक आपत्तीमधून जीवितहानी होऊ नये, ही एकच प्रार्थना आता वरुणराजाला करावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये